आई वडिलांना चुकायचा अधिकार नाही का?

बऱ्याचशा घरात मुले मोठी झाली की आई वडिलांना छोट्या मोठ्या गोष्टींवर दोष द्यायला सुरू करतात. अर्थातच काही अंशी त्यांचीही गफलत होतेच.
कारण या गोष्टी वरचेवर घडत आल्या असतात-
 
१. पालक फक्त जी मुले यशस्वी होतात किंवा जास्त पैसे कमवतात, त्यांनाच प्राधान्य देतात.
 
२. जे मूल धडपडत असतं , काहीतरी करून दाखवायचे प्रयत्न करत असतं, त्याला मात्र हिंमत न देता , सकारात्मक वागणूक न देता , प्रत्येक क्षणी घालूनपाडून बोलले जाते. (जो काहीच प्रयत्न करत नाही तिथे बोलण्याचा हक्क त्यांना नक्कीच आहे. इथे आपलं मूल आपल्याच नजरेत अभिमान पाहण्याच्या प्रयत्न करत असतं हे त्यांना समजतच नाही.)
 
३. आपल्या मुलांमध्येच किंवा बाहेरच्या मुलांबरोबर तुलना करून स्वत:च्या मुलामुलींची उरलीसुरली हिंमत सुद्धा गाळून टाकणे.
 
४. मुलींच्या बाबतींच मात्र, तू कितीही त्रास झाला तरी सासर किंवा नवऱ्याला सोडून येऊ नकोस हे सांगताना ती काय सोसत असेल याचा विचार न करता खूपदा अगदी वाईट बातमी येईपर्यंत ते तिच्यासाठी , फक्त आणि फक्त समाजाच्या भीतीने खंबीरपणाने उभे राहण्याचा विचार सुद्धा करत नाहीत .
 
५. काही तर या थराला पोहोचतात की मुलाच्या संसारात भांडणे लावताना, आपण आपल्या पोटच्या गोळ्याला सुद्धा सोडत नाही हे ही त्यांना जाणवत नाही , का तर तो बायकोचा झालाय , माझे ऐकत नाही, पण त्याची बायको निघून गेली तरी चालेल , आपण दुसरी करून आणू ( माझे पाय चेपायला , घरकामे करायला, कमवायला व आमचा त्रास सहन करायला). हो ही सत्य परिस्थिती आहे.
 
६. अजून काही तर मुलांना मुलींना एवढे लाडावून ठेवतात की ३५- ४० शी क्राॅस झाली तरी ती मुले सगळ्याच गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून राहतात, त्याउप्पर आईवडीलांना ह्या गोष्टींचा अभिमान वाटतो की आपण एवढे श्रीमंत आहोत की आपण मुलांसाठी सगळं करू शकतो. भावनिकरित्या मात्र हेच आईवडील मुलांशी जरा पण जोडलेले नसतात. कधीच मुलं मेंटली डिस्टर्ब का आहेत याची विचारपूस करत नाहीत. त्यांचा मुद्दा एकच, तुला पैसे देतोय ना, मग बस.
पण हा विचार येत नाही की Emotional support and relationships come first , HELPING FINANCIALLY IS THE LAST SUPPORT ANYONE COULD DO, जर पैसा दिला की आपण सर्वश्रेष्ठ आईवडील झालो ही त्यांची संकल्पना च मुळात चुकीची आहे हे त्यांना समजायला हवं कारण जेव्हा आईवडील भावनेने मुलांशी जोडलेले नसतात व ते तसे त्यांच्यांशी प्रेमाने बोलूनही कधी प्रस्थापित करत नाहीत, त्यांनी खरंतर भविष्यात, मुले आमच्याशी इमोशनली जोडलेली नाहीत हे बोलूच नये कारण पूर्णपणे दोष त्यांचाच असतो.
मुले याच प्रकारच्या शिवीगाळ व हडतूड व्यवहारामुळे कधी चुकीच्या लोकांशी जोडले जातात हे समजतच नाही. मग तिथूनही आईवडीलांना त्रासच होतो की मित्रमैत्रीण नकोच.
का हेच आईवडील, भले मुलाकडे कार बंगला नाही पण तो खरंच खूश आहे हे पाहून सुखी रहात नाही? का तुलना करावी? प्रत्येकाचे आयुष्य , वळणं , पैसा , नशीब वेगळे आहे हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा कित्येक heart patients , stress anxiety patients बरे होतील . कारण माझे मूल जसेही असेल त्याला मी पूर्णपणे accept करतो ही समजूत खूप घरं सुंदर बनवतील.
खरंतर तुमच्या मुलांना तुमची मदत लागत नाही तिथेच सर्व सार्थक झालं असं समजावं. ज्या म्हातारपणी आधार असावा या सुप्त इच्छेसाठी हे करत आहोत, ते चुकीचे असून , त्याउलट आपल्या मुलांना आपण किती परावलंबी बनवत आहोत, उद्या आपण नसताना ते समाजात कसे वावरतील हे उमगणे खूप गरजेचे आहे.
 
७. काही तर जणू काही सून यायची वाटच पाहत असतात, मागील सगळ्या वर्षांचा राग काढायला, मग ते मुलाला मुठीत ठेवण्यासाठी अगदी तंत्रमंत्राच्या मार्गाला जाताना मागेपुढे पाहत नाहीत, अशा परिस्थितीत ९०% मुलगा आधीच आईवडीलांच्या इतका अधीन असतो की त्याला बायकोला होणारा जीवघेणा त्रास ही दिसत नाही. (माझ्या clients च्या केसेस वरून बोलतेय).
 
८. अजून काही तर मुलांच्या वाईट सवयी पाहून सुद्धा खूश होतात, की वाह माझा मुलगा / मुलगी काय भारी आहे. या भारीपणाच्या फिलींगमध्ये त्यांना हे सुद्धा कळत नाही की आपल्यावर समाजासाठी काहीतरी चांगलेच द्यायची जबाबदारी आहे.
यांत शिक्षणाचा फार मोठा वाटा आहे. उदाहरणार्थ – आजही खूप पालक मुलांना बरं नसेल, काही इन्फेक्शन असेल तरी शाळेत दामटून पाठवतात. इथे त्यांना फक्त त्यांची मुले महत्वाची आहेत पण हा विचार त्यांना शिवतही नाही की आपण बाकी मुलांना, त्याच्या कुटुंबीयांना किती मोठे इन्फेक्शन देतोय , उद्या कदाचित हे कुणाच्यातरी जीवावर बेतू शकते, हा गुन्हा नाही का?
हे सर्व आज बोलायचा हेतू हाच की , आपल्या समाजात आईवडीलांना खूप मोठा दर्जा दिला जातो , जो बरोबर ही आहे कारण ते खरंच खूप करतात.
पण एक गोष्ट आपण खरंच मानायला हवी की प्रत्येक आईवडील मुलांच्या , पर्यायी समाजाच्या हीताचे वागतात असं नाही.
आज हे ॲक्सेप्ट करणे खूप महत्त्वाचे आहे कारण याशिवाय उपाययोजना करताच येणार नाहीत. जरी आपल्या घरात हे होत नसेल तर या गोष्टींना नजरअंदाज करू नका, अशा भावनिक प्राॅब्लेम्स मध्ये अडकलेल्यांना होईल ती मदत करा, समाजबांधणी करा, कारण उद्या हाच प्रॅाब्लेम आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही.